मुरुम (प्रतिनिधी)- शिक्षण ही केवळ ज्ञानाची प्रक्रिया नाही, तर ती एक व्यवस्थित आणि पारदर्शक प्रणाली आहे.  या प्रणालीत विद्यार्थ्यांना विविध शासकीय व महाविद्यालयीन सेवा वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम 2015 महत्त्वाची भूमिका बजावतो.

या अधिनियमामुळे महाविद्यालयीन प्रशासन अधिक जबाबदार आणि शिस्तबद्ध झाले. प्रत्येक कामासाठी जबाबदार अधिकारी निश्चित असतो. सेवा वेळेत न दिल्यास त्याच्यावर दंडाची तरतूद असल्यामुळे कामात गती आणि प्रामाणिकपणा येतो.

विद्यार्थ्यांसाठी हा कायदा म्हणजे एक हक्काचा आधार आहे. विद्यार्थी अधिक सक्षम बनतात. अशाप्रकारे सेवा हक्क अधिनियम 2015  मुळे महाविद्यालयात  पारदर्शकता वाढेल, प्रशासनावर विश्वास निर्माण होईल आणि हा अधिनियम विद्यार्थी-केंद्रित शिक्षण व्यवस्था निर्माण करेल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले.

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सेवा हक्क अधिनियम 2015 च्या दशकपूर्ती निमित्त शपथ वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. अस्वले यांनी महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम सविस्तरपणे स्पष्ट केला. यावेळी अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे समन्वयक डॉ विनोद देवकर यांनी शपथ वाचन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी ए पिटले, पर्यवेक्षक प्रा शैलेश महामुनी, प्रभारी प्राध्यापक डॉ. ए एस पदमपल्ले, प्रबंधक राजकुमार सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे, महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका आणि कार्यालयीन तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top