धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नाट्य परिषदेला स्वतंत्र सभागृह उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवार 12 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,धाराशिव जिल्ह्यात गेल्या सुमारे 18 वर्षांपासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. पारंपरिक कला जोपासण्या बरोबरच आराधी, वाघ्या मुरळी भारूड, भजन यांसारख्या लोककला प्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम शाखेमार्फत केले जात आहे. तसेच, सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत धाराशिवचे नाव राज्यस्तरावर झळकवले आहे.


 
Top