धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 कोटी रुपयांचा भरीव निधी जाहीर केला आहे. आपण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल नगराध्यक्षा  नेहाताई काकडे यांनी धाराशिव वासियांच्या वतीने उपमुख्यमंत्री महोदयांचे धन्यवाद मानले आहेत.

नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री महोदयांना धाराशिव नगर परिषदेअंतर्गत विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे मागणी पत्र दिले होते. यामध्ये शहरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन, उद्यान निर्मिती आणि नाट्यगृह दुरुस्ती यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या 9 कामांचा समावेश होता.

या मागणीची दखल घेत, विशेषतः शहरातील कलावंत आणि रसिकांची सोय विचारात घेऊन, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी शिंदे साहेबांनी तात्काळ जाहीर केला आहे. धाराशिव नगर परिषद ही अ वर्ग नगर परिषद असून शहराचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. नाट्यगृहाची अवस्था पाहता त्याच्या दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. आमच्या विनंतीला मान देऊन उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा निधी मंजूर केला आहे. याबद्दल संपूर्ण धाराशिव शहरवासियांच्या वतीने त्यांचे मनापासून धन्यवाद मानत या भरीव निधीमुळे आता नाट्यगृहाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल असा विश्वास नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेल्या पत्रात एकूण 128.50 कोटी रुपयांच्या विकासकामांचा आराखडा सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन प्रक्रियेसाठी 11 कोटी, स्मार्ट स्ट्रीट प्रकल्पासाठी 9 कोटी, अमृत 2.0 योजनेच्या स्वहिस्सासाठी 24 कोटी, अग्निशामक व्यवस्थेच्या बळकटी करणासाठी रु 4.50 कोटी आणि नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्ते विकास कामांसाठी 21 कोटी रुपयांच्या मागणीचा यात समावेश आहे. नाट्यगृहासाठी केलेल्या मागणीला यश आले असून निधी मंजूर झाल्यामुळे इतरही विकासकामांना लवकरच गती मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी व्यक्त केला आहे.

 
Top