मुरूम (प्रतिनिधी)- येथील श्री. माधवराव पाटील महाविद्यालयात भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित दोन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी कार्यशाळा महाअभियानाचे नुकतेच थाटात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बसवराज पाटील आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाल उपाध्याय आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना वैचारिक शिदोरी देण्यासाठी या विशेष निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
राजकारणात केवळ निवडणूक जिंकणे हेच ध्येय न ठेवता, कार्यकर्त्यांना राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांची सखोल जाण असावी, यासाठी या कार्यशाळेत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये वक्तृत्व कौशल्य, जनसंपर्क आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचवायच्या, याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी जनसंघ ते जनता पक्ष आणि आजचा भारतीय जनता पक्ष या प्रवासातील पक्षाची जडणघडण व प्राप्त झालेली सत्ता या विषयावर सविस्तर मांडणी केली. या उद्घाटन प्रसंगी लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, या अभियानाचे धाराशिव जिल्हा संयोजक दत्ता राजमाने, ॲड. अनिल काळे, मुरूमचे नगर उपाध्यक्ष रमेश चव्हाण, मुरूम मंडळ अध्यक्ष गणेश अंबर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा उल्हास घुरघुरे यांनी केले.
