भुम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्या मधील जोतिबाचीवाडी येथील जोतिबा याञा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावच्या पंचक्रोशीतील तसेच बीड, सोलापूर ,अहिल्यानगर, भाविकांनी याञेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात्रेच्या निमित्ताने जोतिबा देवस्थान परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली. विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. जोतिबाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने यात्रेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.
शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या जोतिबा यात्रेच्या निमित्ताने याही वर्षी सासन काठ्या,गुलाल खोबऱ्याची उधळण करत शिस्तबद्ध पद्धतीने नयनरम्य जोतिबा पालखी मिरवणूक सोहळ्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी वाद्यांच्या गजरात निघालेली यात्रा पाहण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. याञेतील धार्मिक उत्सवामुळे गावात एकात्मता, भक्ती आणि संस्कृती यांचा संगम अनुभवायला मिळाला. आंबिल,शेरण्या वाटप, सामाजिक जाणीवेतून रक्तदान शिबीर, भव्य कुस्ती स्पर्धा, यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले गेले. जोतिबा यात्रेमुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
कोल्हापूरच्या श्री जोतिबाचे अधिष्ठान म्हणून जोतिबाचीवाडी येथील जोतिबा देवस्थानची विशेष ओळख आहे. चैञ पौर्णिमेच्या निमित्ताने जोतिबा याञा उत्सव सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. यात्रेच्या निमित्ताने हजारो भावी एकत्रित येत जोतिबाच्या भक्तीमय गुलालात रंगून जातात. भक्ती आणि संस्कृतीचा संगम यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यांनी कायमच जोपासली आहे. याञेच्या निमित्ताने व्यावसायिक व नोकरीच्या निमित्ताने असलेले सर्वजण गावकरी एकत्रित येतात हा सर्वांसाठी आनंदही सोहळाच असतो.
- लक्ष्मण जाधव
जोतिबाचीवाडी ग्रामस्थ

