भूम (प्रतिनिधी)- तालुक्यात शासनाच्या धोरणानुसार मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी चालू आहे. तालुक्यातील 7 महसूल मंडळातील 146 रस्ते 248 किमी लांबीचे या योजनेतून तयार केले जाणार आहेत. त्यासाठी भूमचे उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी संबंधीत सर्व विभागांची बैठक तहसील कार्यालयात घेतली. ही योजना राबविण्यासाठी या योजनेशी संबंधीत सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी हजर होते. यावेळी या समितीचे अध्यक्ष प्रा डॉ आमदार तानाजी सावंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी भूमचे उपविभागीय अधिकारी संतोष राऊत,कळंबचे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, भूमचे तहसीलदार जयवंत पाटील,वाशीचे प्रकाश म्हेत्रे, परंड्याच्या अप्पर तहसीलदार पाटील, भूमचे गट विकास अधिकारी लक्ष्मण वाझे यांच्यासह अधिकारी हजर होते. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक सोपी व जलद व्हावी, पावसाळ्यात किंवा खराब हवामानात शेतात जाण्याची सुविधा मिळावी. ग्रामीण भागातील रस्त्याची समस्या दूर व्हावी, शेती उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ते ही योजना सुरु केली आहे. राज्यात 14 डिसेंबर 2025 पासून या कामास सुरुवात राज्याच्या महसूल व वनविभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आजवर याच्या जनजागृतीसाठी बैठका घेण्यात आल्या आहेत.
