धाराशिव (प्रतिनिधी)- मिंटोनेट प्लस व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आयोजित मिंटोनेट प्लस ज्युनियर हॉलिबॉल लीग स्पर्धा 2026 या भव्य स्पर्धेचे आयोजन दिनांक 17 ते 19 एप्रिल दरम्यान नेरुळ, नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे.या हॉल्िबॉल स्पर्धेच्या चषक अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर आमदार कैलास पाटील व व्हॉलीबाल क्षेत्रातील जेष्ठ खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू अंकुश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
धाराशिव-कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांनी क्रीडाक्षेत्रात योगदान देणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक आणि संघटनांचे विशेष कौतुक केलें. छत्रपती शिवाजी हायस्कूल चे क्रीडाशिक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत. यावर्षी छत्रपती क्लबची आठ मुले आणि चार मुली मिंटोनेट स्पर्धेत लातूर लायन्स नावाखाली व इतर संघात सहभागी होत आहेत.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंकुश पाटील यांनी हॉलिबॉलचा इतिहास सांगत खेळाडू कशा संघर्षातून घडले आहेत आणि विद्यमान स्पर्धेत कसें घडत आहेत याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य खोखो संघटनेचे राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा डॉ चंद्रजीत जाधव यांनी क्रीडाक्षेत्रातील धाराशिवचा नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तीमत्वाना कोणताही मतभेद न ठेवता पाठबळ देण्याचे आणि त्यांना जपण्याचे आवाहन केलें.
या कार्यक्रमाप्रसंगी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ एम डी देशमुख सर, उपाध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ् ऍड अविनाशराव देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिरीजाप्पा दहीहांडे, राजकुमार दहीहांडे, राजकुमार सोमवंशी, प्राचार्य व्ही के देशमुख, तालुका क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, हॉल्िबॉल संघटनेचे जिल्हा सचिव सचिन पाळणे, भाई उद्धवराव पाटील शिक्षक आणि शिक्षकेतर पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ सचिन देशमुख, यशदा परिवाराचे सर्वेसर्वा सुधीर सस्ते, श्री विठ्ठल सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, जिल्हा पत्रकार संघांचे माजी अध्यक्ष महेश पोतदार, सामाजिक कार्यकर्ते रवि वाघमारे, नगरसेवक श्री राज निकम, नगरसेवक श्री करवर आदी मान्यवर तसेच बहुसंख्य खेळाडू, गुरुजन,पालक आणि समाजातील प्रतिष्ठित क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात क्रीडाशिक्षक श्री संजय देशमुख यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आय पी एल धर्तीवर हॉल्िबॉल स्पर्धेचे मोठ्या पातळीवर आयोजन करण्यात आलेले आहे, असे सांगत खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर सदरील स्पर्धेची ओळख करून देण्यासाठी चषकाची यात्रा चालू आहे. असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद वीर यांनी तर आभार प्रदर्शन भैरवनाथ खांडेकर यांनी केलें. कार्यक्रम यशस्वी व्हावा. यासाठी अमोल खडके, नीलेश शिंदे, क्रीडाविभागाचे शैलेश पाचभाई आणि आशुतोष माने, प्रथमेश गंगणे व मैदानावरील सर्व खेळाडू व पालक यांनी परिश्रम घेतले.
