कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील शिराढोण ग्रामपंचायतीतील सरपंचांविरुद्ध दाखल प्रकरणात विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी निर्णय देत सरपंचांना पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र ठरविण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात अर्जदार अमित कुमुदराव माकोडे यांनी सरपंच श्रीमती लक्ष्मी दिलीप म्हेत्रे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, 15 वा वित्त आयोग अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचे तसेच काम अपूर्ण असतानाही देयक अदा केल्याचे नमूद करण्यात आले होते.
सदर प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या स्तरावर करण्यात आली. चौकशी अहवालात पाणीपुरवठा योजनेतील काही कामे पूर्ण न होता देयके अदा केल्याचे आणि निधीच्या वापरात नियमांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. यावरून सरपंचांनी कर्तव्यात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला. अर्जदाराच्या वतीने ॲड. अमोल माकोडे यांनी बाजू मांडली, तर प्रतिवादी सरपंच श्रीमती म्हेत्रे यांच्या वतीने ॲड. एच. पी. जाधव यांनी युक्तिवाद केला. विभागीय आयुक्तांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर सरपंचांना पदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.