तुळजापूर (प्रतिनिधी)-   तालुक्यातील मंगरुळ येथील युवकाच्या खून प्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी या प्रकरणात मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले असून, आणखी आरोपींचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे.

बुधवार 15 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेत 36 वर्षीय कृष्णाथ आनंद साठे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, मयताची पत्नी प्रतिभा साठे (वय 28) आणि तिचा प्रियकर शुभम घाटूळे (वय 20) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पत्नीचा सहभाग असल्याने गुन्ह्याला वेगळे वळण मिळाले आहे.

तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील नटकल पुलाजवळ मृतदेह आढळून आल्यानंतरच हा साधा गुन्हा नसून पूर्वनियोजित कट असल्याचा पोलिसांना संशय होता. आरोपींनी डोक्यात दगडाने वार करून हत्या केल्याची कबुली दिली असून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाजवळ टाकल्याचेही उघड झाले आहे. मृतदेह काही अंतर फरपटत नेण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागदेव मुद्दे, पोलीस उपनिरीक्षक विजय घोटे, बीट अंमलदार महादेव राऊत, पोलीस कॉन्स्टेबल वाघोलीकर, संतोष करवर व त्यांच्या पथकाने ही कारवाई वेगाने पूर्ण केली. तपास बहुआयामी पद्धतीने पुढे नेला जात आहे.


 
Top