भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर ढगे परिसरात झालेल्या भीषण अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला असून, चिंचपूर ढगे येथील शेतकरी अक्षय गोकुळ ढगे यांच्या दोन एकर द्राक्ष बागेचे 100% नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे यांनी तातडीने बाधित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणी दरम्यान, द्राक्ष बागेची झालेली दुरवस्था पाहून सभापतींनी चिंता व्यक्त केली. त्यांनी तत्काळ संबंधित कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे व शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सूचना दिल्या. विशेष म्हणजे, पाहणी करत असतानाच खरसडे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बागेची विदारक स्थिती दाखवली. दोन्ही नेत्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकरी अक्षय ढगे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना धीर देत तातडीने मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक हिरालाल ढगे, भगवान पाटील, प्रदीप ढगे पाटील, मयुर ढगे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी चंदनशिवे पी.एम. आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयुक्त पंचनामे आम्ही 100% नुकसान झाले म्हणून विद्यमानाने केले आहेत तरी आम्ही अहवाल शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे, शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्याप्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला योग्य ते नुकसान भरपाई मिळेल.
कृषी अधिकारी प्रदीप चंदनशिवे
