भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपालिकेतील विकासकामांच्या टेंडर प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले असून जनशक्ती नगर विकास आघाडीचे बांधकाम सभापती अनिल शेडगे यांनी विरोधी गटावर जोरदार आरोप करत प्रशासनातील कथित गैरप्रकारांवर पत्रकार परिषदेत भाष्य केले. प्रशासकीय काळात चुकीच्या पद्धतीने विकासकामे राबवून दबाव तंत्र वापरले गेल्यामुळेच मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, आम्ही कोणालाही पळवून लावलेले नाही, असा ठाम दावा त्यांनी केला.

नगराध्यक्षांकडून टेंडर प्रक्रिया ही शहर विकासासाठी नव्हे, तर स्वतःच्या कार्यकर्त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी वापरली जात असल्याचा गंभीर आरोप शेडगे यांनी यावेळी केला. या प्रकारामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले असून अनेक निर्णयांवर संशय निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील स्विमिंग पूल प्रकल्प अद्याप अपूर्ण असतानाही मुदत संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराला बिले अदा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

अलमप्रभू देवस्थान परिसरात एक कोटी रुपयांहून अधिक खर्च करून उभारलेला कुस्ती आखाडा सध्या दुर्लक्षित अवस्थेत असून तो “गाई-गोट्यांचे ठिकाण” बनल्याची टीका त्यांनी केली. जनतेने गैरप्रकारांचा पर्दाफाश करण्यासाठीच जनशक्तीच्या नगरसेवकांना निवडून दिले असून आम्ही निर्भयपणे जनहिताची भूमिका मांडत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जनहिताच्या टेंडरांना नेहमीच पाठिंबा देण्यात आला आहे; मात्र आर्थिक स्वार्थासाठी आणलेल्या टेंडरांना विरोध कायम राहील, अशी भूमिका शेडगे यांनी मांडली. शहरातील लाईट देखभाल व दुरुस्तीचे टेंडर कालबाह्य झाल्याबाबत प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित ठेकेदारांना पुढील कामाबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

यापुढे टेंडर प्रक्रियेत स्थानिक नागरिकांना प्राधान्य देत शहरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे जनशक्ती नगर विकास आघाडीने सांगितले. दरम्यान, जनहिताच्या दृष्टीने काही टेंडर तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. पत्रकार परिषदेला अनेक नगरसेवक रुपेश शेंडगे, आबासाहेब मस्कर, चंद्रमणी गायकवाड, विठ्ठल बागडे, नवनाथ रोकडे, गणेश वीर, राहुल पवार, सोनम बनसोडे, महेंद्र गायकवाड यांच्यासह जनशक्ती नगर विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top