धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली 21 एप्रिल सर्व विभाग प्रमुख यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख यांची उपस्थिती होती.

यावेळी उपजिल्हाधिकारी शेंडे यांनी लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत जिल्ह्यातील विविध विभागाने आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा आढावा सादर केला.

या बैठकीचा मुख्य उद्देश   RTS Performance Dashboard तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (RTS) अंतर्गत सेवांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेणे हा होता. बैठकीत  RTS Performance Dashboard  संदर्भात सर्व संबंधित विभागांचा सखोल आढावा घेण्यात आला.

सेवा वितरणाची गुणवत्ता आणि गती यावर विशेष भर देत प्रलंबित अर्जांची स्थिती तपासण्यात आली.नागरिकांना वेळेत सेवा मिळावी यासाठी कार्यक्षमतेत वाढ करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रलंबित प्रकरणांबाबत गांभीर्याने विचार करून ती लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिल्या तसेच 28 एप्रिल रोजी ‌‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिवस‌’ साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. RTS अपील प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करत पारदर्शकता आणि वेळेत निपटारा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.

सर्व विभागांनी प्रलंबित अर्जांची यादी तयार करून तातडीने निकाली काढावी. सेवा वितरणाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमित आढावा बैठक घेण्यात यावी.महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिवसाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत.लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अपील प्रक्रियेत पारदर्शकता व वेळेत निपटारा सुनिश्चित करावा.असे श्री.पुजार यांनी यावेळी सांगितले.या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्यास अधिक गती मिळणार आहे.

 
Top