तुळजापूर (प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्ट्या आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी माता यांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेच्या वेळेला प्राधान्य देण्याचा नवा ट्रेंड सुरू केला आहे. परिणामी, दररोज पहाटे 1 वाजल्यापासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंदिर प्रशासनाने पहाटे 1 वाजता चरणतीर्थ व धर्मदर्शन सुरू केल्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे. विशेषतः कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य वर्गातील भाविक उष्णता, गर्दी आणि वेळ वाचवण्यासाठी पहाटे दर्शन घेत आहेत.
भाविक रात्री 12 ते 3 दरम्यान तुळजापूरात दाखल होत असून, सर्वप्रथम श्री कल्लोळ, गोमुख तीर्थकुंड येथे स्नान करून देवीचे दर्शन घेतात. त्यानंतर कुलधर्म-कुलाचार पार पाडून नैवेद्य अर्पण करत समाधानाने गावी परत जातात. विशेष म्हणजे, पहाटेच्या वेळेत अवघ्या अर्धा ते पाऊण तासात दर्शन पूर्ण होत असल्याने भाविकांची पसंती या वेळेला वाढत आहे. पूर्वी कर्नाटकातील भाविक पहाटे दर्शनास प्राधान्य देत होते; मात्र आता मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील भाविकही मोठ्या प्रमाणात पहाटे दर्शन घेत आहेत. दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन व्यापारी वर्गानेही रात्रभर दुकाने सुरू ठेवण्यास सुरुवात केली असून, त्यांनाही पहाटेच्या वेळेत चांगला व्यवसाय होत आहे.
तसेच, पहाटेच्या वेळेत मंदिरात गर्दी नियंत्रित राहत असल्याने मंदिर प्रशासनावरील सुरक्षा ताण काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र, कल्लो तीर्थकुंड आणि गोमुख तीर्थकुंड येथे पहाटे लांबच लांब रांगा लागत असल्याने भाविकांनी भवानी तीर्थकुंडात मोफत स्नानाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. एकंदरीत, मृग नक्षत्र व शाळा सुरू होईपर्यंत पहाटे भाविकांची अशीच गर्दी राहणार आहे.
