भुम (प्रतिनिधी)- भूम शहरातील ओंकार चौकास पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी मल्हार आर्मी व सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.
मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कांबळे व सकल धनगर समाज भूम तालुक्याच्या वतीने आज नगरपरिषद भूम चे मुख्याधिकारी व नगरसेवक यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी 300 वे वर्ष सुरू असून त्यांचा सन्मान म्हणून महाराष्ट्र सरकार राज्यभर वेगवेगळे उपक्रम राबवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यास अभिवादन करत आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण देशभर आपल्या कार्याचा ठसा उमटवून मोडकळीस आलेल्या हिंदू धर्मातील मंदिरांचा देशभरात जीर्णोद्धार केलेला आहे. अशा महान रणरागिनीचे भूम शहरातील ओंकार चौकास पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक असे नाव देण्यात यावे. अशी मागणी मल्हार आर्मी व समस्त धनगर बांधवाकडून लेखी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
