धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली शहरी व ग्रामीण भागातील लोड शेडींग बंद करुन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने कमीत कमी 8 तास विज पुरवठा करणेची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. महावितरण कंपनीस लोडशेडींग करायची असेल तर मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला, मलबारहील येथे लोडशेडींग करावी अशी मागणी करत पक्षावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
धाराशिव जिल्हयामध्ये मागील वर्षी मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक उन्हाळी पिकांची लागवड केलेली आहे. परंतु विजेअभावी त्यांची पिके वाळुन जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसानही होत आहे. शेतकऱ्यांना 8 तास सुरुळीत वीज मिळत नाही व जो वीज पुरवठा करण्यात येतो तोही कमी दाबाने पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोटारी नादुरुस्त होणे, वारंवार ट्रान्सफार्मर जळणे अशा गोष्टी घडत आहेत. तर जनावरांना पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परिक्षेचे दिवस असल्यामुळे व रात्री सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासापासुन वंचित रहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.तसेच काही गावांमध्ये संध्याकाळी शेतातील सिंगल फेज वीज पुरवठा 6-10 या काळा मध्ये बंद असतो, बऱ्याच गावामध्ये शेतकरी शेतामध्ये वास्तव्यास असल्यामुळे व शेतात जनावराचे गोठे असल्याने त्यांना या वेळेत वीज नसल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे.
यावेळी शहर प्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना जिल्हाप्रमुख रवि वाघमारे, जगदीश पाटील, प्रदिप घोणे, विठ्ठल सातपुते, राजदिप गायकवाड, आदित्य पवार, शौकत शेख, ज्ञानदेव करवर, पंकज पाटील, अमित उंबरे, राणा बनसोडे, संभाजी सलगर, सिध्देश्वर कोळी, राकेश सुर्यवंशी, अभिजीत कदम, कृष्णा मुंडे, सुनिल वाघ, लखन देशमुख, जगदिश शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
