भूम (प्रतिनिधी)-  संपूर्ण भारतभर राबविण्यात येत असलेल्या गोसन्मान अभियानाच्या पार्श्वभूमीवर भूम शहरात तसेच संपूर्ण तालुक्यातील समस्त गोप्रेमींनी एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन सादर केले. यावेळी सादर करण्यात आलेले निवेदन महामहीम राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावे, अशी विनंतीही करण्यात आली.

देशभरात 27 एप्रिल 2026 ते 27 जुलै 2026 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानाअंतर्गत विविध शासकीय स्तरांवर निवेदन देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार तालुका स्तरावर तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नावे अर्ज सादर करण्यात येणार आहेत.

आज भूम येथे झालेल्या या उपक्रमात गोप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शांततापूर्ण वातावरणात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

गाईला ‌‘राष्ट्रमाता‌’ म्हणून सन्माननीय दर्जा देण्यात यावा. गोसंवर्धन आणि गोसेवेसाठी केंद्रस्तरावर कठोर कायदा लागू करावा. संपूर्ण भारतात गोहत्या पूर्णपणे बंद करावी, जेणेकरून गायींचे संरक्षण सुनिश्चित होईल. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील गोप्रेमी संघटनांनी एकत्र येत शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भूम तालुक्यातील या निवेदन मोहिमेमुळे स्थानिक पातळीवरही या विषयाला गती मिळाल्याचे चित्र दिसून आले.

 
Top