धाराशिव (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असून,पारंपारिक चौकटीतून बाहेर पडत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 1015 प्रकल्पांपैकी तब्बल 622 प्रकल्प महिला उद्योजिकांचे असून, जिल्ह्यात ‌‘नारीशक्ती‌’ची प्रभावी ओळख निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून,सुशिक्षित बेरोजगार महिला व युवकांना उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देते.या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळत असून,त्या केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाहीत,तर कुटुंबाच्या उत्पन्नातही महत्त्वाचा वाटा उचलत आहेत.

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी विविध उद्योगांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.विशेषतः ब्युटी पार्लर,पिठाची गिरणी,मिरची कांडप,खाद्यप्रक्रिया उद्योग,मसाला उद्योग अशा व्यवसायांत महिलांची संख्या लक्षणीय आहे.या उद्योगांमुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होत असून,अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे.

जिल्ह्यातील महिला उद्योजिकांनी विविध क्षेत्रांत आपली छाप पाडली आहे.उपलब्ध आकडेवारीनुसार, ब्युटी पार्लर क्षेत्रात सुमारे 53 महिला उद्योजिकांनी व्यवसाय सुरू केला आहे.पिठाची गिरणी या उद्योगात सुमारे 25 महिलांनी पुढाकार घेतला असून,मिरची कांडप उद्योगात 27 महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारला आहे.याशिवाय मसाला उद्योगात 29, खाद्यप्रक्रिया (फूड प्रोडक्ट्स) क्षेत्रात 81,तसेच बेकरी,कुक्कुटपालन, सलून,झेरॉक्स व ई-सेवा केंद्र अशा विविध क्षेत्रांतही महिलांचा लक्षणीय सहभाग आहे.या उद्योगांमुळे महिलांना स्वावलंबनाची संधी मिळत असून,स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे.

महिलांच्या या उद्योजकीय पुढाकारामुळे केवळ त्यांचे वैयक्तिक सक्षमीकरण होत नाही,तर संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे.ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःचे उद्योग उभे करून सामाजिक बंधने मोडीत काढत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून बँकांशी समन्वय साधून महिलांना कर्जप्राप्ती सुलभ करण्यात आली आहे.अर्ज प्रक्रिया,मार्गदर्शन आणि पाठपुरावा यामुळे महिलांचा सहभाग सातत्याने वाढत आहे.परिणामी, धाराशिव जिल्हा महिला उद्योजकतेच्या क्षेत्रात राज्यात आदर्श ठरत आहे.एकूणच, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांना उद्योग क्षेत्रात नवे दालन खुले झाले असून,महिला सक्षमीकरणातून विकास या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ मिळाले आहे.

 
Top