धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आजपासून कॉमन एंट्रन्स टेस्ट (सीईटी) परीक्षांना सुरुवात झाली असून, एकूण 284 केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे. सीईटी आयुक्त दिलीप बी. सरदेसाई (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यात आला आहे.
परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी मध्यवर्ती डिजिटल देखरेख पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे सर्व केंद्रांवरील हालचालींवर प्रत्यक्ष वेळेत (रिअल टाइम) नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. तसेच, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही पाळत, पर्यवेक्षकांसाठी बॉडी कॅमेरे आणि उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी प्रणाली लागू करण्यात आली आहे. उमेदवारांचा अनुभव अधिक सुलभ आणि समाधानकारक करण्यासाठी केंद्र वाटप प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. याशिवाय, सर्व केंद्रांवर उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने उमेदवारांना आरामदायी आणि निर्विघ्न वातावरणात परीक्षा देता येत आहे.
दरम्यान, परीक्षेबाबत उमेदवारांकडून मिळालेला प्राथमिक प्रतिसाद अत्यंत सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. सुधारित तंत्रज्ञान, सुव्यवस्थित यंत्रणा आणि एकूणच व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सीईटी कक्षाकडून संपूर्ण प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवले जात असून, परीक्षेचे सर्वोच्च निकष कायम राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यंदा परीक्षेत मुलींचा वाढता सहभाग लक्षवेधी ठरत असून, शिक्षणाच्या समान व सर्वसमावेशक संधी देण्याच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल अधिक बळकट होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
