धाराशिव (प्रतिनिधी)-  हनुमान जन्मोत्सव आणि क्रीडा भारती दिनाचे औचित्य साधत शहरात एक अनोखा फिटनेस उपक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने तब्बल 203 खेळाडूंनी एकत्रितपणे दंड-बैठका करत शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश दिला. 

क्रीडा भारतीच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमाची सुरवात क्रीडा भारती चे ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष रामकृष्ण खडके यांच्या हस्ते हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रांत क्रीडा केंद्र प्रमुख प्रवीण गडदे, जिल्हा मंत्री ज्ञानेश्वर भुतेकर, सह मंत्री अभय वाघोलीकर व योगेश थोरबोले, माजी नगरसेवक प्रल्हाद धतुरे, सदस्य राजेश महाजन, मनोज पतंगे, यशोदीप कदम, मनोज जाधवर आदीसह खेळाडू, पालक, क्रीडा प्रेमींची मोठ्या प्रमाणात उपास्तिथी होती.

क्रीडा संकुलातील प्रसन्ना वातावरणामध्ये पार पडलेल्या या उपक्रमात विविध वयोगटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हनुमानाच्या पराक्रम, शक्ती आणि शिस्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत खेळाडूंनी एकजुटीचे दर्शन घडवले. कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. “निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करणे गरजेचे आहे,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये व्यायामाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा भारतीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 
Top