धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील सर्व पक्षांना योग्य न्याय दिला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

धाराशिव जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुका शुक्रवार दि. 27 मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे व शिंदे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सांवत यांना सभापतीपदासाठी भाजपने संधी न दिल्यामुळे नाराज असल्याचे सांगितले जात होते. परंतु निवडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी महायुतीमध्ये कोणीही नाराज नाही, सर्वांशी चर्चा करून सभापतीपदाचे उमेदवार निवडले आहेत असे स्पष्टपणे सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे सातारा जिल्हा परिषदेत मध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे धाराशिव जिल्हा परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीच्यावेळेस बाऊन्स मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या आवारात आण्यात आले होते. 45 जिल्हा परिषद सदस्य ट्राव्हल्स बसने धाराशिव जिल्हा परिषदेत आणण्यात  होते. 


10 विरूध्द 45 मतांनी विजयी

समाजकल्याण सभापतीपदासाठी भाजपाचे विश्वास कोकणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तीर्थराज घाडगे यांचा 45 विरूध्द 10 मताने पराभव केला. तर महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेच्या पुजा तुषार शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या प्रतिक्षा सुरवसे यांचा 45 विरूध्द 10 मताने पराभव केला. तर कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भाऊसाहेब खरसडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जितेंद्र कानडे यांचा 45 विरूध्द 10 मताने पराभव केला. अर्थ व बांधकाम सभापतीपदासाठी भाजपचे सिध्देश्वर कोरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रदिप घोणे यांचा 45 विरूध्द 10 मतांनी पराभव केला. निवडीनंतर सर्व सभापतींनी आपला पदभार स्विकारला. 


 
Top