धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत अत्यंत महत्त्वाचा आणि जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करत पंढरपूर-शेगाव भूम-परंडा मार्गे नवीन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची जोरदार मागणी केली आहे. सोलापूर, धाराशिव आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या दृष्टीने हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, तो महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या श्रद्धेशी निगडित असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर स्पष्ट केले.

लोकसभेत बोलताना खासदार निंबाळकर यांनी नमूद केले की, पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि शेगाव गजानन महाराज मंदिर ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे असून, येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, या दोन्ही तीर्थक्षेत्रांना थेट रेल्वेने जोडणारा मार्ग नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रस्तावित रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होईल, मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र रेल्वे मार्गाने थेट जोडला जाईल. ज्याचा फायदा सामान्य नागरिक आणि भाविकांना होणार आहे.

खासदार निंबाळकर यांनी या रेल्वेमार्गाचे महत्त्व केवळ धार्मिक पर्यटनापुरते मर्यादित नसून, तो सोलापूर, धाराशिव आणि बुलढाणा या जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही अत्यंत उपयुक्त ठरेल, असे ठामपणे मांडले. या मार्गामुळे व्यापार, उद्योग, शेतीमाल वाहतूक आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळणार असून, या मागास भागाच्या विकासाला नवी गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.


 
Top