धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील होतकरू तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार मिळावा आणि स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी 2026-27 आर्थिक वर्षात जिल्ह्यात 108 नवीन उद्योजक तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार असून, यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

केवळ उद्योग सुरू करण्याचा सल्ला न देता, तो प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने तरुणांच्या पाठीशी उभी राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रकल्प अहवाल अर्थात उद्योगासाठी आवश्यक असणारा तांत्रिक प्रकल्प अहवाल तयार करून दिला जाणार आहे. बँकांच्या माध्यमातून आगदी सुलभपणे कर्ज पुरवठा आणि अनुदान उपलब्ध करण्यासाठी विशेष सहकार्य करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध सवलती व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्यही केले जाणार आहे. उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही यंत्रणा मदत करणार आहे.


तरुणांनी केवळ नोकरीमागे न लागता नोकरी देणारे बनावे

या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी 1 एप्रिल 2026 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. तसेच, महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत निवडक उद्योजकांना पुढील दिशा ठरवून दिली जाईल. जिल्ह्यातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे, हा यामागील उद्देश आहे. 108 उद्योजकांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना हक्काचा रोजगार तर मिळेलच मात्र त्यातून अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होईल. असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 
Top