धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील आळणी गावासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा ठरला आहे. गावातील विद्यमान सरपंच प्रमोद वीर यांची पुतणी तसेच कैलास वाशी येथील माजी सरपंच अरुण पापावीर यांची कन्या डॉ. दिव्या अरुण वीर यांनी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या प्राप्त करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
ग्रामीण भागातून येत असतानाही दिव्या यांनी अत्यंत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. लहानपणापासूनच अभ्यासात प्राविण्य मिळवत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर आपली गुणवत्ता सिद्ध केली. मेडिकलसारख्या कठीण शिक्षणप्रवासात त्यांनी अनेक अडचणींवर मात करत अखेर यशाचे शिखर गाठले.
दिव्या यांच्या या यशामागे त्यांचे आई-वडील, कुटुंबीय यांचे सततचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या यशामुळे आळणी गावात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणाच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, याचा आदर्श दिव्या वीर यांनी घालून दिला आहे. त्यांच्या यशामुळे अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा मिळणार आहे. गावकऱ्यांनी “दिव्या पुढे जाऊन समाजसेवेसाठी उत्कृष्ट कार्य करतील आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करतील,” असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकीर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
