धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पीक नुकसानीचे पंचनामेही पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठविला आहे. बाधित 34 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची 9 हजार हेक्टर शेत जमीन खरडून गेली आहे. या बाधित शेतकऱ्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी खरडून गेलेल्या जमिनीवर अन्य प्रकारची शेती करता यावी यासाठी कृषी तज्ञांकडून एक महिन्याच्या आत अहवाल मागवा. असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आयोजित सभेत घेताना सरनाईक बोलत होते. सभेला मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार विक्रम काळे,आमदार कैलास घाडगे पाटील,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, सहाय्यक जिल्हाधिकारी रैवैयाह डोंगरे व निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरनाईक पुढे म्हणाले की,खरडून गेलेल्या जमिनीवर हायड्रोफोनिक शेती कशी करता येईल याचा दूरदृष्टीने अभ्यास करण्यात यावा. पंचनामे करताना मयत जनावरांच्या पशुपालकांना तातडीने मदत करावी. पुरामुळे ज्या विहिरींचे नुकसान झाले आहे. परंतु त्या विहिरींची नोंद सातबारावर नाही अशा शेतकऱ्यांना देखील मदत करण्यात यावी. विहिरीचे नोंद सातबारावर नाही त्यांची नोंद तातडीने घेण्याची कार्यवाही करण्यात यावी असे ते म्हणाले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील यांनी पुरग्रस्त गावातील प्रश्न मांडले. जिल्हाधिकारी पुजार माहिती देताना म्हणाले की,अतिवृष्टी व पुरामुळे झालेला नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे. 5 लक्ष 39 हजार 355 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. 9 व्यक्तींचा मृत्यू झाला असून प्रत्येकी 4 लक्ष याप्रमाणे 36 लक्ष रुपये त्यांच्या वारसांना मदत करण्यात आली असल्याचे पुजार यावेळी म्हणाले. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,सर्व तालुका कृषी अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.