धाराशिव (प्रतिनिधी)-  अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान अभुतपूर्व आहे. त्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीचा पीकविमा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील एकूण शेतकरी बांधवांपैकी सुमारे 30 टक्के बांधवांनी पीकविमा हफ्ता भरला नसल्याची आकडेवारी आहे. ज्यांनी पीकविमा भरलेला नाही अशा शेतकरी बांधवांनाही मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे पीकविमा न भरलेला जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळायला हवा, यासाठी बुधवारी आपण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव मांडला. त्याला मान्यताही देण्यात आली असून हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती 'मित्र'चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील एकूण 733 गावांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात धाराशिव तालुक्यातील सर्वाधिक 125 गावांचे त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यातील 122, भूम, परंडा आणि उमरगा तालुक्यातील 96, लोहारा तालुक्यातील 47, कळंब तालुक्यात 97 तर वाशी तालुक्यातील बाधित गावांची संख्या 54 इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण सहा लाख 39 हजार 927 शेतकरी बांधवांच्या वाट्याला या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान आले आहे. जिल्ह्यात पाच लाख 34 हजार 382 हेक्टरहुन अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. यात पाच लाख 5432 हेक्टर जिराईत, 22 हजार 611 हेक्टर बागायत तर सहा हजार 639 हेक्टर क्षेत्र फळपिकांचे आहे. बाधित असलेल्या संपूर्ण क्षेत्राचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण नुकसानीची तीव्रता अभूतपूर्व अशीच आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार 683 विहिरी खचल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


 
Top