धाराशिव (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील होळकर वाड्यात 11 व 12 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे संस्थापक प्रा. डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली.
शुक्रवार दि. 20 मार्चच्या सायंकाळी धनगर साहित्य संमेलन नियोजन बैठक धाराशिव येथे घेण्यात आली. त्याप्रसंगी डॉ. टकले बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर राहणार असून, संमेलनाचे उद्घाटन विधानसभेचे सभापती राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामभाऊ वडकुते, पत्रकार सुभाष बोंद्रे, बाळासाहेब पाटील, जेष्ट पत्रकार उत्तम कांबळे, मध्यप्रदेशचे मंत्री सैतानसिंग पाल उपस्थित राहणार आहेत. संमेलनात धनगर जमात व राजकीय स्थिती, चांदवडच्या इतिहासात होळकरांचे योगदान आदी चर्चा सत्र होणार आहे. त्याप्रमाणे कवी संमेलनासाठी देशभरातून कवी येणार आहेत. संमेलनाचा समारोप नाशिकचे पोलिस आयुक्त बाळासाहेब वाघमोडे, प्रा. यशपाल भिंगे, माजीमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या बैठकीस माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, जिल्हा बँकेचे माजी संचालक भारत डोलारे, जेष्ठ पत्रकार उज्वलकुमार माने, कवित्री जयश्री तेरकर, ॲड. प्रिया माने, सुभाष मैदांड, डॉ. संजय सोनटक्के, संतोष वतने, हरिश्चंद्र मैदांड, प्रा. सोमनाथ लांडगे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, बिभीषण लोकरे, ॲड. नामदेव तेरकर, अर्चना मैदांड, राजू मैदांड, मल्हारी नवले,संकेत पाटील, बिभीषण हजारे आदी उपस्थित होते.

