तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर केले आहे. विशेष म्हणजे, खुद्द नगराध्यक्षांनीच या प्रकरणी आवाज उठवल्याने शहरात मोठी चर्चा रंगली असून आता पोलिस प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आई तुळजाभवानीचे पवित्र स्थान असलेल्या तुळजापूर शहरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र काही समाजकंटकांकडून या पावन नगरीत जुगार अड्डे, मटका, चक्री, देहविक्री, इंधन व गुटखा विक्री तसेच पत्त्यांचे क्लब अवैध इथेनॉल विक्री असे विविध अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
या प्रकारामुळे तुळजापूरच्या प्रतिमेला तडा जात असून विशेषतः महिला भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अवैध धंदे बंद करून केवळ एजंटवर नव्हे, तर मूळ मालकांवर आणि या धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या नेते मंडळींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. जर कारवाई झाली नाही, तर पुढील आठवड्यात पोलीस कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष व नगरसेवकांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.
या निवेदनावर नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यासह नगरसेवक औदुंबर कदम, नरेश अमृतराव, किशोर साठे, माऊली भोसले, सागर कदम, रत्नदीप भोसले, लखन पेंदे, दिनेश क्षीरसागर, पंडित जगदाळे, अजित परमेश्वर, आनंद सावंत, विजय कंदले, विशाल रोजकरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
