धाराशिव (प्रतिनिधी)-  पुणे येथील ग्रीन पृथ्वी सोल्युशन या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीस नगर परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट दिली. तसेच प्रक्रिया संयंत्र केंद्र (प्रोसेस प्लांट) ची पाहणी केली. 

कंपनीच्यावतीने आसाराम काळे यांनी शिष्टमंडळास कचऱ्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते ? त्यामुळे कचऱ्याची समस्या दूर होऊन त्याचा सकारात्मक परिणाम काय होतो ? याची सविस्तरपणे माहिती दिली. त्यामुळे धाराशिव शहरातील कचरा डेपोचा ही प्रश्न याचपध्दतीने मार्गी लावणार असल्याची माहिती नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी दिली आहे. 

त्यामुळे धाराशिवमधील कचरा डेपोतील कचऱ्यामुळे उद्भवलेल्या समस्या लवकरच सोडविल्या जातील. त्या संदर्भात नगर परिषदेकडून सकारात्मक ठोस आणि सकारात्मक पावले उचलली जात आहेत. लवकरच धाराशिवमधील कचरा डेपोमधील कचऱ्यावर प्रक्रिया (प्रोसेस) करून या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून निर्माण होणाऱ्या सर्व समस्या लवकरच निश्चितपणे संपुष्टात आणण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे व मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिली आहे. या शिष्टमंडळात नगराध्यक्ष काकडे यांच्यासह स्वच्छता सभापती अक्षय ढोबळे, नगरसेवक आकाश तावडे, राहुल काकडे, मुख्याधिकारी नीता अंधारे, उप मुख्याधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे आदी उपस्थित होते.

 
Top