धाराशिव (प्रतिनिधी)-  तालुक्यातील उपळा(मा) शिंगोली, वरुडा, कुमाळवाडी व खताळवाडी या पंचक्रोशीतील हिंदू समाजाच्या वतीने आज गुरुवार, दि. 12 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता उपळा (मा.) येथील सटवाई मळा येथे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात एकात्मता वाढविणे आणि स्थानिक पातळीवर हिंदू समाज संघटित करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. संमेलनाच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेत गावातील सर्व समाजघटकांतील 21 जोडप्यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महादेवाला अभिषेक पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9 ते 10 या वेळेत गावातून ग्रामदिंडी काढण्यात येणार असून याचवेळी हर घर भगवा अभियान राबवून गावातील प्रत्येक घरावर भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी होणाऱ्या मुख्य संमेलनात मेडसिंगा येथील वारकरी परंपरेतील प्रवचनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज एकंबीकर यांचे मार्गदर्शन लाभणार असून सामाजिक समरसता मंचाचे महाराष्ट्र, गोवा व गुजरात क्षेत्र समन्वयक निलेश गद्रे हेही उपस्थितांना संबोधित करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या विचारातून समाजात एकता व संघटन निर्माण व्हावे, हिंदूंमध्ये जातीय भेदभाव नष्ट होऊन समाज एकत्र यावा तसेच सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सामूहिक शक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. या संमेलनास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीसिद्धेश्वर हिंदू संमेलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top