धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात थोर पुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सादर करावा.काही ठिकाणी युवावर्ग अतिउत्साहात चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी पुतळे उभारतात.हे अत्यंत चुकीचे आहे.थोर पुरुषांचे पुतळे उभारताना राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतच्या बैठकीत पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सह आयुक्त त्र्यंबक ढेंगळे यांची उपस्थिती होती.
पूजार म्हणाले की, पुतळा उभारण्यास अधिकृत परवानगी असली तरच संबंधित पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी शासनाकडून निधी मिळू शकतो.चुकीच्या पद्धतीने पुतळे उभारल्यास कायमचे नुकसान आहे. असे पुजार यावेळी म्हणाले. डॉ. घोष, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. या बैठकीला धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा कदम,श ांतता समितीचे धनंजय शिंगाडे, प्रकाश जगताप, विश्वास शिंदे, मशायक सामीयुद्दीन, धनंजय राऊत, कुरेशी, प्रवीण सूर्यवंशी, शेख अयास, जाकीर पठाण, इस्माईल काझी, सिद्धार्थ बनसोडे, ज्ञानेश्वर करवट,गोपाल कदम, आबासाहेब बर्गे, सुनील अंबडेकर, नगरपालिकांचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, अजिंक्य रणदिवे, शैला डाके, सुरेखा कांबळे उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी प्रास्ताविकातून पुतळे उभारण्यासंबंधीच्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती यावेळी दिली व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.
