धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद धाराशिव व आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमातील प्रतिनिधींसाठी आरोग्य तपासणी शिबिर व विविध शासकीय योजनांची माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कै.यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद धाराशिव येथे पार पडलेल्या या शिबिराला जिल्ह्यातील माध्यमांच्या प्रतिनिधींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये पत्रकारांसह अधिकारी-कर्मचारी अशा एकूण 71 जणांची तपासणी करण्यात आली.शिबिरात बाह्यरुग्ण तपासणीअंतर्गत 26 पत्रकार व 45 अधिकारी-कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच प्रयोगशाळा तपासणी 50 जणांची करण्यात आली. मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी 71 जणांची करण्यात आली असून ईसीजी तपासणी 46 जणांची करण्यात आली. याशिवाय आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणीचे कामही करण्यात आले. आरोग्य तपासणीबरोबरच जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना व उपक्रमांची माहिती पत्रकारांना देण्यात आली. दुपारच्या सत्रात विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे पत्रकारांना शासनाच्या योजनांची अचूक माहिती मिळून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या आरोग्य शिबिरास जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, प्रकल्प संचालक अनुप शिंगुलवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) देवदत्त गिरी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top