तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव, टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर, कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, धाराशिव येथील जल व भूमी व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “विकसित धाराशिव  2047  क्षेत्रीय कार्यशाळा मालिके” अंतर्गत “दुष्काळ, पाणी, पर्यावरण आणि शाश्वत विकास” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा टीआयएसएस तुळजापूर येथे उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित पर्यावरण अभ्यासक अतुल देऊगावकर यांनी शाश्वत विकासासाठी पर्यावरणीय दृष्टीकोन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यशाळेस प्रा. बाळ राक्षसे, डॉ. नितीन पाटील, डॉ. संपत काळे, मनोहर दावणे, अभिजित कापरे, विश्वनाथ तोडकर, प्रमोद झिंझाडे, शहाजी गडहिरे, जुल्फिकार काझी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी देऊगावकर म्हणाले की, बदलत्या हवामान परिस्थितीत पाणी, जमीन व नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी स्थानिक नियोजन, लोकसहभाग आणि नवकल्पनांचा प्रभावी वापर आवश्यक असून विकास प्रक्रियेत पर्यावरण संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्यशाळेत डॉ. नितीन पाटील यांनी जल व भूमी व्यवस्थापन, पर्यावरणीय समस्या आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन करताना धाराशिव जिल्ह्याची सद्यस्थिती आणि भविष्यातील धोरणे यावर सविस्तर माहिती दिली.

प्रा. बाळ राक्षसे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, लोकसहभागातूनच दुष्काळमुक्त व शाश्वत धाराशिव घडेल” या विषयावर मार्गदर्शन केले तेम्हणाले की, दुष्काळ, पाणी व पर्यावरण या समस्या केवळ शासनाच्या उपाययोजनां बरोबरच त्या लोकसहभाग, स्थानिक नियोजन आणि शाश्वत दृष्टिकोन याने सुटणार आहेत त्या अनुषंगाने विकसित धाराशिव घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.”

द्वितीय सत्रात विविध मान्यवरांनी आपल्या अनुभवातून विकासाच्या विविध अंगांवर मार्गदर्शन केले. सत्राची सुरुवात विश्वनाथ तोडकर यांनी करत जलसंधारणाच्या उपाययोजनांवर भर दिला. प्रमोद झिंझाडे यांनी स्थानिक संसाधनांचा योग्य वापर व शेतकरी सहभागातून शाश्वत शेतीचे महत्त्व स्पष्ट केले.

शहाजी गडहिरे यांनी पारंपरिक जलव्यवस्थापन पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. तर जुल्फिकार काझी यांनी महिला सक्षमीकरणाची भूमिका स्पष्ट केली. मनोहर दावणे यांनी कोहिजन संस्थेच्या कार्याचा आढावा घेत शाश्वत विकासासाठी संशोधन व नियोजनाची गरज मांडली. अभिजित कापरे यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या जलतारा, सेंद्रिय शेती व शाश्वत विकास उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. संपत कळे यांनी टीआयएसएसच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत “विकसित धाराशिव व्हिजन डॉक्युमेंट” तयार करण्यासाठी ही कार्यशाळा दिशादर्शक ठरणार असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश चादरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. शंकर ठाकरे यांनी केले.

 
Top