धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत धाराशिव तालुक्यातील खेड येथील स्मिता जयंत शिंदे हिने उल्लेखनीय यश संपादन करत मंडल कृषी अधिकारी (वर्ग-2) पदाला गवसणी घातली आहे. तिने 450 पैकी 293 गुण मिळवत ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात 17 वा क्रमांक पटकावला आहे.
स्मिता शिंदे हिने यापूर्वीही एमपीएससी परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारली होती. सातत्यपूर्ण प्रयत्न, अभ्यासाची सवय आणि जिद्दीच्या जोरावर अखेर तिने यशाला गवसणी घालत आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. स्मिता हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धाराशिव शहरात झाले. पुढे तिने बीएससी (ॲग्री) चे शिक्षण कोल्हापूर येथून पूर्ण केले, तर एमएस्सी (ॲग्री) पदवी पुणे येथून संपादन केली. सध्या ती राहुरी येथील कृषी विद्यापीठात पीएचडीसाठी संशोधन करत आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना स्मिता शिंदे म्हणाली की, प्रामाणिक मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर हे यश मिळवता आले. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा मला अत्यंत आनंद आहे. पुढे ती म्हणाली की, ग्रामीण भागातील होतकरू मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर घडवावे. त्यासाठी पालकांनी मुलींना प्रोत्साहन व संधी द्यावी, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली. स्मिता हिचे वडील जयंत शिंदे हे प्रगतिशील शेतकरी असून आई गृहिणी आहे. तिच्या या यशाबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
