धाराशिव (प्रतिनिधी)- प्रा. सुबोध कांबळे यांनी नुकतीच पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा व्ही.पी. शैक्षणिक संकुलात विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी व्ही.पी. शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी तसेच एसबीएनएम फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे आणि एस.पी. पॉलीटेक्निकचे प्राचार्य अमरसिंह कवडे उपस्थित होते. औषधी वनस्पतींमधील अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांचा वैद्यकीय क्षेत्रात उपयोग करण्याची गरज लक्षात घेऊन प्रा. सुबोध कांबळे यांनी “ओनोस्मा ब्रॅक्टीएटमचे पृथक्करण, निष्कर्षण, संरचनात्मक स्पष्टीकरण व गुणात्मक आणि परिमाणात्मक अंदाज” या विषयावर संशोधन केले. त्यांनी डॉ. प्रशांत सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यप्रदेशातील सर्वेपल्ली राधाकृष्णन विद्यापीठ, भोपाळ येथे हा शोधप्रबंध सादर करून पीएचडी पदवी प्राप्त केली.
या सन्मान कार्यक्रमास प्रा. हरी घाडगे, प्राचार्य ऋषिकेश लोमटे, प्रा. दत्तात्रय घावटे, योगेश मंडलिक, सुनील बनसोडे, बालाजी वाघमारे तसेच व्ही.पी. शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
