धाराशिव (प्रतिनिधी)-   महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासात्मक पालट होत असून,या उपक्रमात केवळ संख्येपेक्षा गुणवत्तापूर्ण कामाला अधिक महत्त्व आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांची संख्या जरी मोठी नसली तरी त्यांनी केलेले काम अत्यंत दर्जेदार आहे. महिला जिद्दीने व्यवसाय करून आर्थिक उलाढाल वाढवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महिलांना बचत गटात समाविष्ट करून एकही कुटुंब या चळवळीपासून वंचित राहू नये, असे आवाहन असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. 

धाराशिव शहरातील शहर पोलीस स्टेशनजवळील उस्मानाबाद क्लब मैदानावर महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त ‌‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प‌’ अंतर्गत 27 ते 29 मार्च दरम्यान आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक साळुंके,प्रभारी महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महादेवी रणदिवे तसेच माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर यांनी केले. सूत्रसंचालन सीएमआरसीचे सहव्यवस्थापक किशोर टोम्पे यांनी केले,तर उपस्थितांचे आभार सीएमआरसी व्यवस्थापक महादेव पवार यांनी मानले.या कार्यक्रमास बचत गटातील महिला,अधिकारी,कर्मचारी तसेच सीएमआरसीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top