धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणुका सुरळीत पार पडल्याचे वातावरण निर्माण केले आहे. या निवडीमध्ये महायुतीमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना पक्षाचे लोकसभा युवा जिल्हाप्रमुख आनंद पाटील यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा सतीश पाटील यांना अर्थ व बांधकाम सभापतीपद देण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठी पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रताप सरनाईक व जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी तसेच आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आदेश दिलेले होते. असे असताना देखील आपल्या आईला सभापतीपदापासून वंचित ठेवले आहे. असा आरोप आनंद पाटील यांनी केला आहे.
विशेष म्हणजे मॅनेज असलेल्या कळंबच्या सदस्यास सभापतीपदाची संधी दिल्याचा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आपण लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या जिल्हा परिषद सदस्य पदाचा तर युवा जिल्हाप्रमुख पदाचा एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाणावर भाजपचे उमेदवार उभे केल्याचे पाटील यांनी सांगितले. निवडून आल्यानंतर भाजपचे पदाधिकारी असलेले आणि मॅनेज करून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले शिवसेनेचे दोन उमेदवार भाजपने पळून नेले. त्या पळवून नेलेल्या एका मॅनेज सदस्याला सभापतीपद बहाल केल्या असल्याचा आरोप करून हे सर्व राजकारण शिवसेनेच्या आयात केलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
