धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून त्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कांद्याच्या लागवडीसाठी लागणारे बियाणे, खते, कीडनाशके, मजुरी तसेच इतर शेतीसंबंधित खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, बाजारपेठेत कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होत आहे.

डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. विशेषतः कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान दिल्यास त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.तसेच शासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंतीही त्यांनी केली आहे. राज्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.

 
Top