भुम (प्रतिनिधी)-  लाल मातीचा अस्सल रांगडेपणा जोपासणाऱ्या भूम तालुक्यातील ईट नगरीत, कुस्तीचा महाकुंभ भरला जाणार आहे. जागृत देवस्थान श्री खोपेश्वर महादेव यांच्या वार्षिक यात्रेचे औचित्य साधून, मंगळवार, दि. 31 मार्च रोजी दुपारी 4 वाजता पीएमश्री जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.

या स्पर्धेसाठी मानाची चांदीची गदा अन्‌‍ लाखांची ईनामे बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेली आहेत. या होत असलेल्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात महाराष्ट्रातील दिग्गज मल्ल आपले बाहुबळ पणाला लावणार आहेत. “ईट येथील या भव्य कुस्ती मैदानात पैलवानांसाठी भरघोस बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानाचे बक्षीस जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ भोरे यांच्या वतीने 71 हजार रुपये रोख आणि चांदीची गदा देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पुणे येथील लहुजी सेना कार्याध्यक्ष गणेश थोरात यांच्या वतीने 61 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस भुम पंचायत समीती सदस्य बाळासाहेब खरवडे यांच्या वतीने 51 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच चौथ्या क्रमांकासाठी डॉ. मनोज सासवडे यांच्याकडून 40 हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकासाठी पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक उमेश पानसरे यांच्या वतीने 21 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सोबतच 11 हजार रुपयांची बक्षिसे सुनील देशमुख,गणेश दीक्षित,अशोक लिमकर, बालाजी हुंबे,रमेश भोसले, ज्ञानेश्वर डोके,उमेश सोन्ने, सयाजीराजे हुंबे यांनी दिली आहेत. 5000 हजारांसह अनेक बक्षिसेही या मैदानाचे आकर्षण असणार आहेत.“

 

 
Top