तुळजापूर (प्रतिनिधी)- देशभरात क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाचा शिखर गाठणारी आयपीएल स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होत आहे. पण या क्रिकेट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात मात्र एका वेगळ्याच ‘खेळा’ची चर्चा रंगू लागली आहे ती म्हणजे सट्टा बाजाराची.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएलच्या कालावधीत तुळजापूर परिसरात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या या शहरात विविध अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा असताना, आता त्यात सट्टा बाजाराची भर पडणार असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. क्रिकेटमधील प्रत्येक बॉलवर रन, चौकार, षटकार, विकेट यावर पैसे लावले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मोबाईल ॲप्स, ऑनलाईन नेटवर्क आणि स्थानिक एजंट यांच्या माध्यमातून हा सट्टा मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, या सट्टा व्यवहारात तरुणांचा वाढता सहभाग ही सर्वात गंभीर बाब ठरत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक तरुण या जाळ्यात अडकत असून, त्यामुळे भविष्यात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शहरात आयपीएल काळात दररोज लाखोंचा सट्टा लावला जातो, अशी माहिती पुढे येत आहे. सट्टा घेणाऱ्या अड्ड्यांवर गर्दी वाढल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, तुळजापूरातील नागरिकांकडून एकच मागणी जोर धरू लागली आहे “आगामी आयपीएलमध्ये सट्टा बाजार सुरू होऊ देऊ नका, तरुणाई वाचवा!”नगराध्यक्षांनी अलीकडेच अवैध धंद्यांविरोधात हल्लाबोल करत कठोर भूमिका घेतल्याने, आता सट्टा बाजार रोखण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर येऊन ठेपली आहे.