धाराशिव (प्रतिनिधी)- दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल जप्त न करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तुळजापूर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. श्रीनिवास रामदास आरदवाड (वय 48) असे या लाचखोर पोलिसाचे नाव असून बुधवारी (दि. 4) तुळजापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ही धडक कारवाई करण्यात आली.
तक्रारदारावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी एएसआय आरदवाड यांनी यापूर्वीच 10 हजार रुपये घेतले होते. मात्र, तरीही त्यांनी गुन्ह्यामध्ये अतिरिक्त कलमे न वाढवण्यासाठी आणि गाडी जप्त न करण्यासाठी तक्रारदाराकडे नव्याने 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी तत्काळ धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि. 4 मार्च) पडताळणी केली. यावेळी आरदवाड यांनी तडजोडीअंती 5 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लगेचच तुळजापूर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला आणि तक्रारदाराकडून 5 हजारांची लाच घेताना एएसआय आरदवाड यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांच्या अंगझडतीमध्ये 5,300 रुपये रोख, एक विवो कंपनीचा मोबाईल, पोलीस आयडी कार्ड आणि इतर साहित्य मिळून आले आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या घराची झडती आली आहे.
