धाराशिव (प्रतिनिधी)-  गेल्या 1 महिन्यापासून चर्चेत असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या अर्चनाताई पाटील 45 विरूध्द 9 मतांनी विजयी झाल्या. तर उपाध्यक्षपदावर महायुतीमधीलच शिंदे सेनेच्या उषाताई गायकवाड 45 विरूध्द 10 मतांनी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच भाजपसह महायुतीची सत्ता आल्यामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. 

जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सकाळी 10.30 वाजल्यापासून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झाली होती. अध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजपकडून अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उषा रविंद्र गायकवाड यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने ठाकरे शिवसेनेच्या कांचनमाला संगवे यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.  तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गेल्या 32 दिवसापासून सहलीवर असलेले महायुतीचे सदस्य दुपारी दीडच्या सुमारास ट्रॅव्हल्सने धाराशिवमध्ये दाखल झाले. त्यानंतर ती बस जिल्हा परिषदेच्या गेटसमोर उभा करून महायुतीचे 45 सदस्य पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्चना पाटील यांच्या बाजूने 45 मते मिळाली. तर कांचनमाला संगवे यांना केवळ 9 मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यावेळीस काँग्रेसच्या मोरे उशिरा सभागृहात दाखल झाल्यामुळे महायुतीच्या उषा गायकवाड यांच्या बाजूने 45 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात असलेल्या महेश देशमुख यांना 10 मते मिळाली. 

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, युवक नेते मल्हार पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, ॲड. अनिल काळे आदी उपस्थित होते. 


अथक परिश्रमाचा विजय 

महायुतीच्या विजयासाठी गेल्या अनेक वर्षापासून अनेकांनी परिश्रम घेतले आहे. त्यामुळे यावेळेस धाराशिव जिल्हा परिषदमध्ये भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली आहे. असे सांगून माजी आमदार व भाजपचे जेष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. 


मोठ्या डॉक्टरकडून शस्त्रक्रिया

शिंदे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध होता. त्यामुळे सावंत यांनी शिवसेनेच्या 15 सदस्यांपैकी 8 सदस्य आपल्याच ताब्यात ठेवले होते. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर महायुतीमध्ये सावंत गटाची शिवसेना एकत्र आले. त्याबद्दल बोलताना एका जेष्ठ नेत्यांनी मोठ्या डॉक्टरकडून शस्त्रक्रिया केल्यामुळे सावंत गट एकत्र आल्याचे सांगितले. 


 
Top