धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी संत निरंकारी मंडळ रजि. दिल्ली शाखा धाराशिव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकाटे नानी यांनी भूषविले. तसेच नारी सत्संग प्रबंधक सुशीला नागटिळक यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने महिलांना शिक्षण, स्वावलंबन, आरोग्य आणि समान हक्क याबाबत जनजागृती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच महिलांनी आत्मविश्वासाने पुढे जाऊन समाजाच्या उन्नतीत योगदान द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजात महिलांविषयी आदर, समानता आणि बंधुभाव वाढविण्याचा संदेश देण्यात आला. “नर नारी एक समान” तसेच “एक ज्योत हो सबके अंदर, नर हो चाहें नारी हो” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
