भूम (प्रतिनिधी)-  ऊस तोडीसाठी उचल घेतलेल्या पैशांच्या परताव्यावरून झालेल्या अमानुष मारहाण आणि मानसिक त्रासाला कंटाळून, भूम तालुक्यातील उळूप येथील एका 42 वर्षीय इसमाने आपली जीवनयात्रा संपवली. मयत रणजीत सर्जेराव सानप असे या दुर्दैवी नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मयत सानप यांच्या पुतण्याने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मयत रणजीत सानप यांनी ऊस तोडीच्या कामासाठी काही पैसे उचल म्हणून घेतले होते. हे पैसे परत करण्याच्या कारणावरून तालुक्यातील रामेश्वर येथील औदुंबर ऊर्फ पिनू विष्णू दराडे याने सानप यांच्याकडे तगादा लावला होता.

दिनांक 11 मार्च 2026 रोजी पिनु दराडे यांनी रणजीत सानप यांना रामेश्वर येथे बोलावून घेतले आणि तिथेच त्यांना बसवून ठेवले. वेळेत पैसे मिळाले नाही म्हणून अमानुष छळ सुरू केला. केवळ पैशांच्या वसुलीसाठी सानप यांना तिथे शारीरिक मारहाण करण्यात आली. आरोपीने त्यांचा प्रचंड मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. आरोपीकडून झालेल्या या सततच्या जाचाला आणि अपमानाला कंटाळून रणजीत सानप यांनी टोकाचे पाऊल उचलले. 12 मार्च 2026 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास, ब-हाणपूर शिवारातील चौघुले यांच्या शेतात एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याने यात त्यांचा मृत्यू झाला. अशी फिर्याद मयत रणजीत सानप यांच्या पुतण्याने दिल्याने भूम पोलिसांनी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. 


 
Top