धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील बेंबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‌‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा‌’च्या माध्यमातून 843 लाभार्थींना शिबिरस्थळावरच दिलासा मिळाला. फेरफार मंजूर करणे, तयार सातबारा उपलब्ध करून देणे, विविध प्रकारची प्रमाणपत्रे वितरित करणे, ट्रॅक्टर वितरण आदींसाठी शेतकरी व लाभार्थींना शिबिरस्थळावरच लाभ मिळवून देण्यात आला. तहसीलदार मृणाल जाधव यांनी दिवसभर येथे थांबून लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले.

बेंबळी येथील नामानंद फूड प्रॉडक्ट कंपनीच्या हॉलमध्ये बुधवारी हे शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय सहआयुक्त मनीषा मिसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार मृणाल जाधव, बेंबळीच्या पंचायत समिती सदस्या सरस्वती वाघुलकर, पाडोळीचे सदस्य अमोल मस्के उपस्थित होते. यावेळी महसूल विभागासह आरोग्य, एसटी महामंडळ, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका वितरण, विविध प्रमाणपत्र वितरण आदी संदर्भातील 16 स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांना जागेवरच लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने फेरफार मंजूर करणे, शेतकऱ्यांचे सातबारा तयार करणे, क्षेत्ररस्त्याची प्रकरणे सोडवणे, वारस फेरफार मंजूर करणे यासोबतच जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलियर आदी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. उमेद योजना, ॲग्रीस्टिक योजना, महिलांविषयक योजना, कृषिविषयक योजना यासाठी 429 लाभार्थींना शिबिरातच लाभ मिळवून देण्यात आला, तर 50 जणांचे अर्ज यावेळी भरून घेण्यात आले. शिधापत्रिका, आधार अपडेटेशन, आयुष्यमान कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, पिक कर्ज योजना, मतदार कार्ड दुरुस्ती आदी संदर्भात 289 जणांना लाभ वितरित करण्यात आला. याचे 75 जणांचे अर्ज भरून घेण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बेंबळी येथील मंडळ अधिकारी एम. जे. जांभळदरे, महाळंगीचे जी. व्ही. मुंडे, बेंबळीचे एस. डी. जगदाळे, आंबेवाडीचे एम. एस. ढवळशंख, टाकळी बेंबळीचे आर. एस. कदम व कनगराचे ए. एस. आत्तार आदी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी योगदान दिले.


विविध विषयांवर मार्गदर्शन

शेतकरी आत्महत्या कशा रोखाव्यात, यावर समाधान शिंदे, महाळंगी येथील ‌‘श्री श्री जैविक निविष्ठा केंद्रा‌’चे अध्यक्ष किरण ढवळे, नामानंद फूड फॅक्टरीचे प्रमुख चंदन भडंगे, माजी न्यायाधीश भीमाशंकर भडंगे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सुरेखा ढवळे, उदय माने तसेच अंगणवाडी विभागाच्या वंदना हजारे यांनी मार्गदर्शन केले. महाळंगी येथील जीवनराव पाटील यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीसाठी स्वतःची दोन गुंठे जमीन महाळंगी ग्रामपंचायतीला दानपत्र करून दिल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


पौष्टिक पाककृतींचा घेतला आस्वाद

शिबिरामध्ये अंगणवाडी विभागाच्या वतीने बेंबळीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका व्ही. बी. लोंढे यांच्या पुढाकारातून विविध प्रकारच्या पौष्टिक पाककृती सादर करण्यात आल्या. यामध्ये लहान मुले व गर्भवती महिलांसाठी पौष्टिक असलेले धपाटे, लाडू, ढोकळा, ज्यूस आदी पदार्थ तयार करण्यात आले होते. विभागीय सहआयुक्त मिसकर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी या पाककृतींचा आस्वाद घेतला. तसेच त्याचे तंत्र जाणून घेत काही पदार्थ सोबतही घेतले.

 
Top