तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ कळंब श्री. आर. के. राजेभोसले यांची माहिती
कळंब : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १४ मार्च, २०२६ रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, कळंब या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील लोकअदालतीमध्ये एकुण पाच पॅनल तयार करण्यात आलेले होते. पॅनल क्रमांक एक साठी श्री. आर. के. राजेभोसले जिल्हा न्यायाधीश-१ कळंब यांनी पॅनल प्रमुख तर अॅड. एस. आर. बुधवंत यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले, पॅनल क्रमांक २ साठी श्री. पी. आर. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश व. स्तर कळंब व पॅनल पंच म्हणून अॅड. ए. एस. पडवळ, पॅनल क्रमांक ३ साठी श्री. के. के. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब व पॅनल पंच म्हणून अॅड. श्रीमती पी. आर. कांबळे, पॅनल क्रमांक ४ साठी श्री. एन. एम. रेड्डी, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब व पॅनल पंच म्हणून अॅड. श्रीमती आर. टी. ठोंबरे तर पॅनल क्रमांक ५ साठी श्रीमती ए. डी. जाधव, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, कळंब यांनी पॅनल प्रमुख तर अॅड. श्रीमती एस. एस. कुलकर्णी यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.
सदरील लोकअदालतीमध्ये पाच पॅनलकडील ठेवण्यात आलेल्या एकुण १३४९ दिवाणी प्रकरणांपैकी २२ दिवाणी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. सदरील लोकअदालतीमध्ये ०४ मोटार वाहन अपघात प्रकरणामध्ये रक्कम रुपये ३४,२५,०००/- (अक्षरी रुपये चौतीस लाख पंचेवीस हजार फक्त) इतक्या रकमेची तर रक्कम वसुलीच्या ०५ दरखास्तीमध्ये रक्कम रुपये ३२,२१,००४/- (अक्षरी रुपये बत्तीस लाख एकेवीस हजार चार फक्त) तसेच बॅंकेच्या प्रलंबित रक्कम वसुलीच्या ०६ दाव्यामध्ये रक्कम रुपये ५५,४३,३३६/- (अक्षरी रुपये पंचावन्न लाख त्रेचाळीस हजार तीनशे छत्तीस फक्त) इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. तसेच दिवाणी स्वरुपाच्या एकुण ७ तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच विविध स्वरुपाच्या एकुण ३९२ फौजदारी प्रकरणांपैकी एम.एस.ई.बी. अॅक्ट ची ३ प्रकरणे रक्कम रुपये २३,४४०/- (अक्षरी रुपये तेवीस हजार चारशे चाळीस फक्त) च्या तडजोडीअंती मिटविण्यात आली. तसेच विविध स्वरुपाच्या गुन्हा कबुलीच्या एकुण १५१ प्रकरणांपैकी १९ प्रकरणामध्ये रक्कम रुपये २२,७००/- (अक्षरी रुपये बावीस हजार सातशे फक्त) इतकी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली. त्याचप्रमाणे सदरील लोकअदालतीच्या दिवशी विविध बॅंका, ग्रामपंचायती, नगर परिषद, पतसंस्था अशा इतर कार्यालयांमार्फत एकुण २१७१ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणे सादर करण्यात आलेली होती, त्यापैकी बॅंकेच्या एकुण ७ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये बॅंक यांचेमार्फत लोकअदालती दिवशी एकुण रक्कम रुपये ३,८३,०००/- (अक्षरी रुपये तीन लाख त्र्याऐंशी हजार फक्त) इतकी रक्कम वसुल करण्यात आली. त्याचप्रमाणे लोकअदालतीच्या अनुषंगाने नगर परिषद कळंब यांचे वतीने एकुण ६६ प्रकरणांमध्ये रक्कम रुपये १२,४३,१६७/- (अक्षरी रुपये बारा लाख त्रेचाळीस हजार एकशे सदुसष्ठ फक्त) इतकी रक्कम नगर परिषद स्तरावर वसुल करण्यात आली. कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या एकुण १२६१ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणांमध्ये संबंधित ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत स्तरावर एकुण रक्कम रुपये १०,७३,२५८/- (अक्षरी रुपये दहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावन्न फक्त) इतकी रक्कम लोकअदालतीच्या माध्यमातून वसुल करण्यात आल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ कळंब श्री. आर. के. राजेभोसले यांनी दिली. राष्ट्रीय लोकअदालत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलिस प्रशासन यांनी परिश्रम घेतले.
