धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतरही अनेक टीका-टिपण्या झाल्या, मात्र आम्ही त्या सर्वांना अत्यंत संयमाने उत्तर दिले. भाजप हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असतानाही महायुतीला सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा शब्द होता. आज जिल्हा परिषदेत महायुती अभेद्य असल्याचे सिद्ध झाल्याने सर्वाधिक समाधान वाटत आहे, अशा शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सौ. अर्चना पाटील आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषाताई रवींद्र गायकवाड यांची निर्विवाद निवड झाल्यानंतर आमदार पाटील यांनी महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

महायुतीची एकजूट ही काळाची गरज असल्याचे सांगत आमदार पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत महायुती एकत्रित राहणे ही जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी गरजेची होती आणि त्यात आम्हाला पूर्णतः यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात महायुती म्हणून लढण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. ज्या विश्वासाने जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीला मोठे बळ दिले आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे.

विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊनच भविष्यातील वाटचाल करण्याचे आम्ही ठरवले आहे.जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या अडचणी दूर करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पावर आपण परिश्रम घेत असल्याचे सांगितले. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि जिल्ह्याचा कायापालट करणे ही आमची मोठी जबाबदारी आहे. नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेप्रमाणेच भविष्यातही सर्वांना विश्वासात घेऊन महायुतीची वाटचाल धाराशिव जिल्ह्यात भक्कम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा आत्या पवार,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, माजी आमदार राजन साळवी, श्री ज्ञानराज चौगुले, श्री बसवराज पाटील, श्री राहुल मोटे, श्री सुजितसिंह ठाकूर, श्री सुरेश बिराजदार, श्री सुनील चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रिपाईचे राजाभाऊ ओव्हाळ, श्री संताजी चालुक्य, श्री अभय चालुक्य, श्री राहुल पाटील सास्तुकर यांच्यासह महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.


भविष्यातही महायुती भक्कम राहणार

महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने हा विजय खेचून आणला आहे. निवडून आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी त्यांना माझ्याकडून पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top