धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एखादे महत्वपूर्ण ऑपरेशन झाल्यास त्या ऑपरेशनसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू होईल. अशी माहिती धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर, आयुष्यमान कार्ड काढणे व शासकीय योजनेची माहिती कार्यशाळा या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वागत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, शिक्षणाधिकारी खंदारे आदी उपस्थित होते. बांधकाम विभागाची माहिती देताना वागत यांनी तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण आदीबाबत माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी पाणीपुरवठा योजना व समाजकल्याण विभागाच्या योजनेसंदर्भात माहिती विचारली. परंतु समाजकल्याण विभागाला पुर्ण माहिती देता आली नाही.
4 हजाराची लस मोफत
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही ही लस मोफत दिली जाणार आहे. या लसीची किंमत 4 हजार रूपये असून, 14 वर्षे पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील 16 हजार 500 मुलींना येता तीन महिन्यात ही लस दिली जाणार आहे. ही लस मुलींच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असून, त्या विषयी कोणताही समज, गैरसमज बाळगू नये अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी पत्रकारांना दिली. यावेळी डॉ. हरिदास यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनेसंदर्भात माहिती दिली.
14 कोटी 56 लाखाची वसूली
जिल्ह्यात जानेवारी 2026 पर्यंत विविध ग्रामपंचायतने थकीत असलेले कर वसूल केले असून, 14 कोटी 56 लाख रूपयांची वसूली झाली असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी पत्रकारांना दिली. ग्रामीण भागातील वसुलीचे हे प्रमाण 89 टक्के असल्याचे सांगून, कुंभार यांनी थकीत करावर 50 टक्के सुट दिल्यामुळे वसुली मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले.
