तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच आता धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे राजकारण तापू लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनेचा उमेदवार बसवण्यासाठी राणा पाटलांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी केले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांपैकी सहा ठिकाणी शिवसेनाचे सभापती निवडून आले असून दोन ठिकाणी भाजपाचे सभापती झाले आहेत. या विजयाबद्दल सर्व विजयी सदस्यांचे अभिनंदन करताना केदार यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेची सुरुवातीपासूनच मागणी असल्याचे स्पष्ट केले. हे पद मिळवण्यासाठी पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, माजी पालकमंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सदस्य तसेच तुळजापूर तालुक्यातील माजी नगराध्यक्ष देवानंद रोजकरी आणि त्यांची कन्या, मंगरूळ येथील जिल्हा परिषद सदस्य सिमाताई भैरव माडजे या देखील ठाण्यात दाखल झाल्याची माहिती योगेश केदार यांनी दिली यांनी दिली.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. पंचायत समित्यांमधील निकालानंतर आता जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
Top