तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे घाटशिळ रोडवरील वाहनतळात उभी असलेल्या कारचे चाक अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.10) रात्री घडली. या प्रकारामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील हर्षल उत्तम साळवे (वय 29, व्यवसाय शेती) हे मंगळवारी रात्री दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. त्यांनी आपली इर्टिगा कार (क्र. एमएच 05 एफव्ही 2061) घाटशिळ रोडवरील वाहनतळात पार्किंग पावती काढून उभी केली आणि रात्री मुक्कामासाठी रूमवर गेले.
बुधवारी सकाळी कारची पाहणी करताना कारच्या मागील बाजूच्या डाव्या साईडचे मंकव्हीलसह टायर अज्ञात चोरट्याने काढून नेल्याचे आढळले. या घटनेत सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.
या प्रकरणी तक्रारीवरून मांजरे यांच्या आदेशानुसार एन.सी. दाखल करण्यात आली असून पुढील तपासासाठी पोलीस कर्मचारी पापुलवार यांच्याकडे प्रकरण सोपवण्यात आले आहे. या घटनेमुळे वाहनतळातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे येथील सीसीटीव्ही चालू नसल्याचे कळते. तसेच वाहनतळाच्या बाहेरच्या बाजूस मोठ्या संख्येने दुकाने असल्याने वाहनताळाच्या बाह्य बाजूला असलेले लॉजच्या सीसीटीव्हीत ही चोरीची घटना कैद झाली नसल्याचे समजते. त्यानंतर या भाविकाने जुने टायर विकत घेऊन आपल्या कारला बसवून गावी रवाना व्हावे लागले.
