धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने टेकोत्सव टेक डायजेस्ट (नोव्हेंबर 2025 मार्च 2026) या तंत्रज्ञान विषयक मॅगझिनचे प्रकाशन नुकतेच पार पडले.
हे प्रकाशन ट्रस्टच्या मानव संसाधन अधिकारी अनुराधा देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या सर्टीफाईड नामांकित पॉश ट्रेनर ऋता पंडित, कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने आणि विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोल्हे उपस्थित होते.
या मॅगझिनमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी पूर्ण केलेल्या इंडस्ट्रियल कोर्सेस, टेक्निकल सर्टिफिकेशन्स, इंटर्नशिप्स आणि इंडस्ट्रियल विजिट्स यांची संक्षिप्त माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, लिनक्स सर्टिफिकेशन्स, सायबर सिक्युरिटी आणि पायथन प्रोग्रॅमिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानांवर विद्यार्थी-शिक्षकांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती तसेच विभागातील विविध स्पर्धांचे अहवाल या अंकात सादर करण्यात आले आहेत.
हा सर्वांगसुंदर अंक तयार करण्यासाठी प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी मागील चार महिन्यांतील विभागातील कार्यक्रमांचा बारकाईने मागोवा घेत अतिशय मनोवेधक संकलन सादर केले आहे. प्राचार्य, विभागप्रमुख, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, इंटरनल कॉलिटी इन्शुरन्स सेल, इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल आणि इंटर्नशिप सेल यांच्या पुढाकाराने साकारलेला हा अंक विद्यार्थ्यांना नवीन तांत्रिक घडामोडींची ओळख करून देणारा आणि नवोन्मेषाला चालना देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संशोधन, प्रकल्प, नवकल्पना आणि उद्योगसंबंध या क्षेत्रांत अधिक सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञानातील बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी विभागातील प्रा. एस.जी. शिंदे, प्रा. एस.जी. अघोर, प्रा. एन.व्ही. भोसले, प्रा. व्हि.सी. मैंदर्गी, प्रा. व्हि.ए. डावरे, प्रा. डि.व्ही. हराळकर, प्रा. ए.डी. बोरकर, प्रा. ए.आर. देशपांडे, प्रा. व्हि.एस. बोंदर, प्रा. एस. इंगळे उपस्थित होते.
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, मित्राचे उपाध्यक्ष संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे यांनी टेकोत्सव टेक्निकल डायजेस्टला शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातही असे विद्यार्थी-उपयोगी उपक्रम होत राहतील, अशी आशा व्यक्त केली.
